मिरारोडमधील एमडी ड्रग रॅकेटचा पर्दाफाश; रसायने, लॅब साहित्य जप्त, १३ आरोपी अटकेत

मिरारोडमधील एमडी ड्रग रॅकेटचा पर्दाफाश; रसायने, लॅब साहित्य जप्त, १३ आरोपी अटकेत

सुधाकर नाडार / मुंबई 

मुंबई : मिरारोड परिसरात एमडी ड्रग तयार करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ ने पर्दाफाश केला असून, या कारवाईत एमडी ड्रग निर्मितीसाठी वापरली जाणारी रसायने आणि लॅब साहित्य जप्त करण्यात आले आहे. आतापर्यंत या प्रकरणात दोन महिलांसह १३ आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण १४ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल २०२६ रोजी मिरारोड पूर्व येथील नयानगर परिसरातील छेडा आदर्श बिल्डिंगमधील एका घरावर छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत १ किलो ३२४ ग्रॅम वजनाचे सुमारे २ कोटी ६६ लाख १७ हजार २८० रुपये किमतीचे एमडी ड्रग जप्त करण्यात आले होते.

या प्रकरणी श्रीमती फिरदोस अरबाज कुरेशी आणि तिचा पती अरबाज वकील कुरेशी यांच्याविरोधात नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०२/२०२६ अंतर्गत अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ कडे वर्ग करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी क्रमांक १२ आणि १३ यांच्याकडून एमडी ड्रग निर्मितीसाठी वापरली जाणारी सुमारे २५५ लिटर रसायने जप्त केली. यामध्ये सोडियम हायड्रॉक्साइड पॅलेट्स, हायड्रोक्लोरिक अॅसिड, अॅसिटोन, डायक्लोरोमेथेन, मिथाइलअमाइन आणि क्लोरोफॉर्म यांसारख्या रसायनांचा समावेश आहे. तसेच हीटिंग ड्रायर, सेपरेशन फ्लास्क, हीटिंग मॅन्टल रिकव्हरी फ्लास्क, फोर फिंगर क्लॅम्प, अॅडिशन पॉट आणि बुचनर फनेल यांसारखे लॅब साहित्यही जप्त करण्यात आले.

ही सामग्री मालवणी परिसरातील सामना नगरमागील लग्न मैदान, आजमी नगर तसेच मनोरी-गोराई परिसरातून हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या संपूर्ण कारवाईत आतापर्यंत एकूण ६ किलो ७७३ ग्रॅम एमडी ड्रग जप्त करण्यात आले असून, तपास अद्याप सुरू आहे.

पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४च्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon