प्रेमासाठी बांगलादेशातून थेट जळगाव गाठले; बेकायदेशीर प्रवेशप्रकरणी तरुणीसह प्रियकर अटकेत

प्रेमासाठी बांगलादेशातून थेट जळगाव गाठले; बेकायदेशीर प्रवेशप्रकरणी तरुणीसह प्रियकर अटकेत

योगेश पांडे / वार्ताहर 

जळगाव : सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर एका २० वर्षीय बांगलादेशी तरुणीने थेट भारतात बेकायदेशीर प्रवेश करून जळगाव गाठल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांनी संबंधित तरुणी आणि तिला आश्रय देणाऱ्या तरुणाला अटक केली असून, दोघांविरोधात परदेशी नागरिक आणि इमिग्रेशन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणीका राणी शामलचंद्र राय असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव असून, ती मूळची बांगलादेशातील रहिवासी आहे. तर चिन्मय जगन्नाथ वाला हा जळगावातील जोशी पेठ परिसरात राहणारा सुवर्ण कारागीर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशी पेठ भागात एक परदेशी महिला विनापरवाना वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता कोणीका राणी ही तरुणी आढळून आली. चौकशीदरम्यान तिच्याकडे कोणतेही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे निष्पन्न झाले.

तपासात पुढे उघड झाले की, सोशल मीडियावरून कोणीका राणी आणि चिन्मय वाला यांची ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर लग्न करण्याच्या उद्देशाने कोणीका हिने बेकायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश केला आणि जळगाव गाठले. ती काही दिवसांपासून चिन्मयसोबत राहत होती.

दरम्यान, दोघांनी आपण विवाह केल्याचा दावा पोलिसांसमोर केला असला तरी त्याबाबत कोणतेही अधिकृत कागदपत्र सादर करण्यात आलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी दोघांविरोधात इमिग्रेशन आणि परदेशी नागरिक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.

सध्या देशभरात अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात विविध स्तरांवर कारवाया सुरू असताना जळगाव पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास शनिपेठ पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon