कोथरूडमध्ये विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ; हुंड्यासाठी विष देऊन हत्या केल्याचा आरोप
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : कोथरूड परिसरात १८ वर्षीय विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली असून, हुंड्यासाठी छळ करून जेवणातून विष देत तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणामुळे हुंडाबळी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मृत तरुणीचे नाव श्रुती सुनील बनसोडे असे आहे. तिचा विवाह बुद्धभूषण गायकवाड याच्यासोबत २८ मार्च २०२४ रोजी झाला होता. नातेवाईकांच्या माहितीनुसार, दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, विवाहाच्या वेळी श्रुती ही अल्पवयीन असून केवळ १६ वर्षांची होती, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
लग्नानंतर काही महिन्यांतच श्रुतीचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. अधिक पैशांची मागणी करत पती, सासू, सासरे आणि दीर यांनी संगनमताने तिचा छळ केला, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. श्रुतीने सासरी होत असलेल्या त्रासाची माहिती वेळोवेळी माहेरच्या मंडळींना दिली होती. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा करून वाद मिटवण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता.
तथापि, छळ थांबला नसल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी गंभीर दावा केला आहे की, सासरच्या मंडळींनी कट रचून श्रुतीच्या जेवणात विष मिसळले आणि त्यातून तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून मृत्यूचे नेमके कारण आणि आरोपांची सत्यता तपासली जात असून, वैद्यकीय अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.