उल्हासनगरात अनधिकृत शेड बांधकामावरून खळबळ

उल्हासनगरात अनधिकृत शेड बांधकामावरून खळबळ

व्हिनस टॉकीजसमोरील जागेवर भूमाफियांचा कब्जा?; ‘पोलीस महानगर’कडून MRTP व BNS अंतर्गत कारवाईची मागणी

पोलीस महानगर नेटवर्क 

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ येथील व्हिनस टॉकीजसमोरील मोकळ्या सार्वजनिक जागेवर सुरू असलेल्या कथित अनधिकृत व्यावसायिक शेड बांधकामामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी “पोलीस महानगर”चे कार्यकारी संपादक प्रकाश संकपाळ यांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त व प्रभाग समिती क्रमांक ४ च्या प्रभाग अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल करून तात्काळ फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, काही भूमाफिया व अतिक्रमणकर्त्यांनी संबंधित जागेवर कोणतीही वैध बांधकाम परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात लोखंडी अँगल व पत्र्याचे व्यावसायिक शेड उभारण्याचे काम सुरू केले आहे. हे बांधकाम महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम (MRTP Act) तसेच विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, संबंधित प्रभाग कार्यालयातील काही अधिकारी, बीट मुकादम आणि अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांच्या संगनमतातूनच हे बांधकाम सुरू असल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्रशासनाच्या माहितीशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर बांधकाम होणे शक्य नसल्याने या प्रकरणात भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

तक्रारीत महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमातील कलम ५२, ५३ व ५४ अंतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली असून, भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हेगारी अतिक्रमण, मालमत्तेचे नुकसान, गुन्हेगारी कट आणि लोकसेवकांकडून कर्तव्यात कसूर अशा संभाव्य गुन्ह्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी महानगरपालिका प्रशासन व पोलिसांनी संयुक्त पंचनामा करून सुरू असलेले बांधकाम तात्काळ बंद करावे, संबंधित शेड जमीनदोस्त करावे तसेच अतिक्रमणकर्ते आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात FIR दाखल करावी, अशी मागणी केली आहे. याशिवाय संबंधित जागेची मालकी, आरक्षण, विकास आराखडा आणि बांधकाम परवानग्यांची स्वतंत्र चौकशी करून अहवाल सार्वजनिक करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon