रायगडच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; शिवसेनेच्या नगराध्यक्षांचा अवघ्या ४ दिवसांत राजीनामा

रायगडच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; शिवसेनेच्या नगराध्यक्षांचा अवघ्या ४ दिवसांत राजीनामा

योगेश पांडे / वार्ताहर 

रायगड – म्हसळा नगरपंचायतीतील राजकारणाने अवघ्या चार दिवसांत नाट्यमय कलाटणी घेतली आहे. नुकतेच नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या शिवसेनेचे शाहिद जंजिरकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने रायगड जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सोमवारी रायगड दौऱ्यावर असतानाच ही घडामोड घडल्याने राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले आहे. ७ मे रोजी झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे शाहिद जंजिरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनिल शेडगे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. म्हसळा नगरपंचायतीतील १७ पैकी ९ सदस्यांचे समर्थन मिळवत शिवसेनेने सत्ता काबीज केली होती. त्यामुळे स्थानिक स्तरावर शिवसेनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. अवघ्या चार दिवसांतच जंजिरकर यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

म्हसळा नगरपंचायतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती व्हावी, अशी अपेक्षा वरिष्ठ पातळीवरून व्यक्त करण्यात आली होती. मात्र त्याला बगल देत शिवसेनेने स्वतंत्र भूमिका घेत निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या होत्या. अखेर वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर जंजिरकर यांना राजीनामा देण्याच्या सूचना देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात झालेल्या चर्चेनंतर नगराध्यक्षपदासाठी तडजोडीचा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार पहिले तीन महिने राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उर्वरित कालावधी शिवसेनेकडे नगराध्यक्षपद राहणार असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत कोणत्याही पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दरम्यान, नव्याने निवडून आलेल्या शाहिद जंजिरकर यांचा राजकीय बळी घेतल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये व्यक्त होत आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे म्हसळा नगरपंचायतीतील सत्तासमीकरणे बदलली असून, रायगडच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. आता पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडला जाणार का? आणि या राजकीय तडजोडीमागे नेमके कोणते समीकरण आहे? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या राजीनाम्यानंबाबत शाहिद जंजिरकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आम्ही वरिष्ठांच्या आदेशांनुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला आलो आहोत, अशी प्रतिक्रिया शाहिद जंजिरकर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon