लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; कल्याणमधील विवाहित आरोपी अटकेत
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण : लग्नाचे आश्वासन देत एका २७ वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कोनगाव पोलिसांनी विवाहित व्यक्तीला अटक केली आहे. आरोपीने पत्नीला घटस्फोट देऊन विवाह करणार असल्याचे सांगत तरुणीची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कल्याण पूर्व परिसरात वास्तव्यास असून आरोपीदेखील त्याच भागात राहतो. काही वर्षांपूर्वी दोघांची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. याच दरम्यान आरोपी विवाहित असल्याचे समोर आले. मात्र, पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्याशी लग्न करणार असल्याचे आश्वासन आरोपीने तरुणीला दिले होते.
तक्रारीनुसार, सप्टेंबर २०२४ ते एप्रिल २०२६ या कालावधीत आरोपीने विविध ठिकाणी भेटण्यासाठी बोलावून तरुणीवर वारंवार अत्याचार केले. काही वेळा तिला लॉजमध्ये नेण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, पीडिता गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिच्यावर गर्भपातासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात करण्यास भाग पाडल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतर आरोपी लग्नाबाबत टाळाटाळ करू लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात आले. त्यानंतर तिने कोनगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.