बीड हादरले! चुलत भावाकडून १५ वर्षीय भोळसर बहिणीवर अत्याचार; दोन महिन्यांची गर्भवती, प्रकृती गंभीर

बीड हादरले! चुलत भावाकडून १५ वर्षीय भोळसर बहिणीवर अत्याचार; दोन महिन्यांची गर्भवती, प्रकृती गंभीर

पोलीस महानगर नेटवर्क 

माजलगाव (बीड): कुटुंबातील नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन चुलत भावाने आपल्या १५ वर्षीय भोळसर चुलत बहिणीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. या प्रकरणात पीडित मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला बीडच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी स्वभावाने अत्यंत भोळसर आणि निष्पाप आहे. याचा गैरफायदा घेत तिच्या चुलत भावाने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात सुरुवातीला आली नाही. काही दिवसांपूर्वी मुलीला पोटात तीव्र वेदना सुरू झाल्याने कुटुंबीयांनी तिला माजलगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात सोनोग्राफी करण्यात आली. अहवालात मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. या धक्कादायक वास्तवाने संपूर्ण कुटुंब हादरले. नंतर पीडित मुलीचा गर्भपात करण्यात आला. मात्र, गर्भपातानंतर तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली. सध्या तिला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर सघन उपचार सुरू आहेत.

या प्रकरणात गर्भपात करणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरांनाही पोलिसांच्या रडारवर आणण्यात आले आहे. अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात योग्य ती माहिती पोलिसांना न देण्याच्या संशयावरून डॉक्टरांच्या भूमिकेची चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ माजली असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेबाबत आणि कुटुंबातील नातेसंबंधांवरील विश्वासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon