‘आई ही आईच असते’; मुलाच्या जीवासाठी आईचे किडनीदान, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये होणार प्रत्यारोपण

‘आई ही आईच असते’; मुलाच्या जीवासाठी आईचे किडनीदान, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये होणार प्रत्यारोपण

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई : मुलाच्या जीवासाठी आई कितीही मोठा त्याग करू शकते, याचे हृदयस्पर्शी उदाहरण मुंबईत समोर आले आहे. मूत्रपिंड निकामी झालेल्या २४ वर्षीय मुलाला नवजीवन देण्यासाठी त्याच्या आईने स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला असून, येत्या काही दिवसांत मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडणार आहे.

तळोजा परिसरात राहणाऱ्या रिटा सिंग यांनी आपल्या मुलगा आयुष कार्तिकसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयुषच्या दोन्ही किडन्या सुमारे दोन वर्षांपूर्वी निकामी झाल्यानंतर त्याच्यावर सातत्याने उपचार सुरू होते. गेल्या काही महिन्यांपासून त्याला आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करावे लागत होते. त्यामुळे त्याचे दैनंदिन आयुष्य पूर्णपणे विस्कळीत झाले होते.

सततच्या उपचारांमुळे आयुषला सामान्य जीवन जगणे कठीण बनले होते. अखेर डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण हाच प्रभावी पर्याय असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याची आई रिटा सिंग यांनी स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे आई आणि मुलाच्या रक्तगटात फरक असूनही वैद्यकीय तपासणीनंतर प्रत्यारोपण शक्य असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. रिटा सिंग यांचा रक्तगट ‘ओ पॉझिटिव्ह’ तर आयुषचा रक्तगट ‘ए पॉझिटिव्ह’ असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

डॉ. श्रीरंग बिचू यांच्या देखरेखीखाली आयुषवर उपचार सुरू असून, आई आणि मुलाच्या सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. दोघांचीही प्रकृती शस्त्रक्रियेसाठी अनुकूल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, एका आईने आपल्या मुलासाठी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ‘आई ही आईच असते’ या वाक्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon