मुलुंडमध्ये संशयातून ३१ वर्षीय युवकाची हत्या; आरोपी अटकेत
रवि निषाद / मुंबई
मुंबई : मुलुंड पश्चिम येथील जे.एन. रोड परिसरात साई प्लाझा समोर शुक्रवारी (२ मे) रात्री साडेनऊच्या सुमारास एका ३१ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोषकुमार वकील बिंद (वय ३१) असे मृत युवकाचे नाव आहे. आरोपी राकेश कुमार झिकू धिवर (वय ४२) याने संतोषकुमारवर चाकूने हल्ला केला. हल्ल्यात संतोषकुमार गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
प्राथमिक तपासात आरोपीला संतोषकुमारचा आपल्या पत्नीसोबत संबंध असल्याचा संशय होता. या संशयातूनच त्याने संतोषकुमारवर तोंड, गळा, छाती, पोट, पाठ आणि हातांवर वार करत जीवे ठार मारल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६०२/२०२६ अंतर्गत भा.न्या.सं. कलम १०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने पथक तयार करून आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता ७ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन खडगे करत आहेत.