परदेशी नोकरीच्या आमिषाने ५० लाखांची फसवणूक; रत्नागिरीत दोघांविरुद्ध गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
रत्नागिरी : परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून दिल्लीतील व्यक्तीकडून सुमारे ५० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सज्जाद अहमद खान (५४, रा. नवी दिल्ली) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार इसाम इरफान जांभारकर आणि अस्लम इरफान जांभारकर (दोघेही रा. एमआयडीसी, मिरजोळे, रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी परदेशात कामगार पाठवून मोठे कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यावर विश्वास ठेवून खान यांनी ५६ जणांना परदेशात नोकरीला लावण्यासाठी प्रत्येकी ८५ हजार रुपये या प्रमाणे एकूण सुमारे ५० लाख रुपये गोळा केले. ही रक्कम त्यांनी मिरजोळे येथील आरोपींच्या निवासस्थानी रोख स्वरूपात दिली होती.
मात्र, आरोपींनी संबंधित कामगारांना नियोजित देशात न पाठवता इतरत्र पाठविल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली. अखेर खान यांना सर्व ५६ कामगारांना स्वतःच्या खर्चाने भारतात परत आणावे लागले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी रत्नागिरीत येऊन तक्रार दाखल केली.
ही घटना १ जुलै २०२५ ते १ मे २०२६ या कालावधीत घडल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, परदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणारे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.