कल्याण पूर्वेत वाहतूक पोलिसावर पुन्हा हल्ला; नांदिवलीत तीन जणांकडून मारहाण, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

कल्याण पूर्वेत वाहतूक पोलिसावर पुन्हा हल्ला; नांदिवलीत तीन जणांकडून मारहाण, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

योगेश पांडे / वार्ताहर

कल्याण : कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसावर तिघांकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वाहतूक पोलिसांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

नांदिवली येथील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस देविदास वाघेरे कार्यरत होते. यावेळी त्यांनी एका कारचालकाला वाहन रस्त्याच्या कडेला घेण्यास सांगितले. मात्र, या सूचनेचा राग आल्याने संबंधित चालक आणि त्याच्या साथीदारांनी वाघेरे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. वाद चिघळताच तिघांनी वाघेरे यांना ठोसे व बुक्क्यांनी मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या हल्ल्यात वाघेरे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी जखमी पोलीस देविदास वाघेरे यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सागर साळुंखे आणि आतिष दहातोंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करणे तसेच पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान, यापूर्वीही कल्याण परिसरात वाहतूक पोलिसांवर मारहाणीच्या तीन घटना घडल्या असून ही चौथी घटना ठरली आहे. त्यामुळे कर्तव्य बजावताना पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. या घटनेचा पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon