कांदिवली एएनसीची कारवाई; ५०८ ग्रॅम हेरॉईनसह आरोपी अटकेत
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई : एंटी नारकोटिक्स सेलच्या (कांदिवली युनिट) पथकाने मालाड (पश्चिम) परिसरात छापा टाकून ५०८ ग्रॅम हेरॉईनसह एका आरोपीला अटक केली. जप्त अंमली पदार्थांची अंदाजे किंमत २ कोटी ५४ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई १ मे रोजी पहाटे सुमारे ४.३० वाजता स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर उद्यानासमोर, जयचंदलाल कारवा रोडवरील अथेना इमारतीजवळील फुटपाथवर करण्यात आली. या वेळी संशयित व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्याकडून हेरॉईन आढळून आले.
अटक आरोपीची ओळख मोहम्मद बेलाल मोहम्मद हासिम शेख (वय ४३) अशी असून तो बिहारमधील समस्तीपुर येथील रहिवासी आहे. तपासात त्याचा यापूर्वीही गुन्हेगारी इतिहास असल्याचे उघड झाले आहे. २०२४ मध्ये एंटी नारकोटिक्स सेल आणि एनसीबी, मुंबई झोनल युनिटकडे त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल असून, त्या प्रकरणात तो सध्या जामिनावर होता.
सदर प्रकरणात एनडीपीएस कायदा, १९८५ च्या कलम ८(क) आणि २१(क) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.