कामगार दिनी पवईत धक्कादायक अपघात; गटार साफ करताना टेम्पो चढून ३ पालिका कामगार जखमी

कामगार दिनी पवईत धक्कादायक अपघात; गटार साफ करताना टेम्पो चढून ३ पालिका कामगार जखमी

पोलीस महानगर नेटवर्क 

मुंबई : कामगार दिनाच्या दिवशीच पवई परिसरात घडलेल्या अपघाताने कामगार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गटार साफसफाईचे काम सुरू असताना टेम्पो अंगावरून गेल्याने मुंबई महापालिकेचे तीन कामगार जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

पालिकेच्या कंत्राटदारामार्फत पवई परिसरात रस्त्यावरील गटाराची साफसफाई सुरू होती. या वेळी काम सुरू असलेल्या ठिकाणी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था न ठेवता काम करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. कामगार गटारात उतरून साफसफाई करत असतानाच अचानक एक टेम्पो फुटपाथवर चढला आणि कामगारांच्या अंगावरून गेला. या घटनेत तीन जण जखमी झाले.

माहितीनुसार, कामाच्या ठिकाणी ना सुरक्षा रक्षक तैनात होते, ना वाहतूक नियंत्रणाची कोणतीही उपाययोजना करण्यात आली होती. त्यामुळेच हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

दरम्यान, मुंबई महानगरपालिका कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघातास कारणीभूत घटकांचा तपास सुरू केला आहे. संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon