महाराष्ट्र दिन- कामगार दिनानिमित्त ५०० सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान
सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त सायन-कोळीवाडा विधानसभा क्षेत्रात भाजप आमदार तमिल सेलवन यांच्या वतीने विशेष सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बीएमसीच्या एफ/नॉर्थ विभाग कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात सुमारे ५०० महिला व पुरुष सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
या वेळी आमदार तमिल सेलवन यांनी कामगारांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “या कामगारांना दोन दिवस जरी सुट्टी दिली, तरी मुंबईत कचऱ्याचे ढीग साचतील. ते दररोज पहाटेपासून कठोर परिश्रम करतात; त्यामुळे शहराची स्वच्छता टिकून आहे.” त्यांनी कामगारांच्या मेहनतीची दखल घेत प्रशासनातील भिन्न कार्यपद्धतीवरही भाष्य केले.
कार्यक्रमादरम्यान महिला कामगारांना साड्या, तर पुरुष कामगारांना पॅन्ट-शर्ट भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी एफ/नॉर्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त अरुण क्षीरसागर, इतर महापालिका अधिकारी तसेच भाजप महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
कामगारांच्या परिश्रमाचा गौरव करण्यासाठी आयोजित या उपक्रमामुळे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य अधोरेखित झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.