शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष अधिक तीव्र!

शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष अधिक तीव्र!

मंत्री प्रताप सरनाईकांवर जागा हडपल्याचा गंभीर आरोप; भाजप आमदार नरेंद्र मेहता थेट पोलीस ठाण्यात

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यात राजकीय कुरघोडी सुरू असल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे, मुंबईतील मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्यानंतर एकत्र आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर देखील या दोन्ही नेत्यांची जुगलबंदी पाहायला मिळाली होती. मात्र, आता सरनाईक आणि मेहता यांच्यातील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला असून, आमदार नरेंद्र मेहता यांनी मंत्री प्रताप सरनाईक आणि ते यांच्या समर्थकांवर जागा हडपण्याचा गंभीर आरोप केला आहे. त्याच अनुषंगाने सोमवारी नरेंद्र मेहता थेट पोलीस ठाण्यात गेल्याचं दिसून आलं.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांना मराठी सक्ती केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अड. गुणरत्न सदावर्तेंसह रिक्षाचालक संघटनांही नाराजी व्यक्त करत रोष दर्शवत आहेत. त्यातच, आता आमदार नरेंद्र मेहता यांनी भाईंदरपाडा येथील एका कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन प्रताप सरनाईक यांच्यावर जागा हडपल्याचा गंभीर आरोप केला आहे.

नरेंद्र मेहता यांनी दावा केला आहे की, कासारवडवली परिसरातील भाईंदरपाडा येथील भूमिपुत्र असलेल्या भोईर कुटुंबाच्या मालकीची सुमारे १२१९ चौरस मीटर जमीन बळकावण्यात आली आहे. भोईर कुटुंबाच्या एकूण २४३९ चौरस मीटर जागेपैकी निम्म्याहून अधिक जागेवर अतिक्रमण करून ती हडपल्याचा आरोप मेहता यांनी केला आहे. या गंभीर प्रकरणाविरोधात सोमवारी नरेंद्र मेहता यांनी आपले कार्यकर्ते, नगरसेवक आणि महापौरांसह कासारवडवली पोलीस ठाणे येथे भेट देत भोईर कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी केली आहे. मेहता यांनी संबंधित जागेलाही भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली.

दरम्यान, प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश प्रताप सरनाईक यांनी आमदार नरेंद्र मेहता यांना उद्देशून एक पत्र लिहत जोरदार टीका केली होती. मेहता यांनी केलेल्या “प्रताप सरनाईक मेरे ड्रायव्हर असते” या वक्तव्याचा उल्लेख करत, या पत्रात पूर्वेश सरनाईक यांनी ते विधान अत्यंत आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीचे असल्याचे म्हटले होते. राजकारणात मतभेद असू शकतात, मात्र त्यामध्ये सभ्यता आणि मर्यादा पाळणे आवश्यक असल्याचंही पूर्वेश यांनी म्हटलं होतं. तेव्हापासूनच हा वाद अधिक चिघळल्याचं दिसून येतं, त्यातच आता मेहता यांनी थेट पोलीस ठाणे गाठल्याने प्रताप सरनाईक काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, यापूर्वी प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या जनता दरबारात मेहतांनी जागा हडपल्या संदर्भात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून, चौकशी सेल नेमणार असल्याचं देखील सांगितले होतं. आता मेहतांच्या या आरोपांमुळे मिरा भाईंदरमधील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून, आता या प्रकरणावर मंत्री प्रताप सरनाईक यांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon