रायगड पोलिसांची तत्पर कारवाई; २४ तासांत सेंट्रिंग प्लेट चोरीचा गुन्हा उघड, ६.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
रायगड : हिरानंदानी फॉर्च्युनसिटी, भोकरपाडा येथील भोकरपाडा परिसरातून अंदाजे ६ लाख ३० हजार रुपये किमतीच्या अॅल्युमिनियम धातूच्या सेंट्रिंग प्लेट चोरीप्रकरणी रसायनी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपींना जेरबंद करत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. या जलद कारवाईमुळे रायगड पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिरानंदानी फॉर्च्युनसिटी परिसरातील बांधकाम प्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅल्युमिनियम सेंट्रिंग प्लेट्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. याप्रकरणी तक्रार दाखल होताच रसायनी पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला.
घटनास्थळाची पाहणी, परिसरातील माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. अवघ्या २४ तासांच्या आत आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सर्व अॅल्युमिनियम सेंट्रिंग प्लेट्स जप्त करण्यात आल्या.
या कारवाईमुळे बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळाला असून पोलिसांच्या तत्परतेबद्दल स्थानिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आणि तपास पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. आरोपींविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.