धावत्या लोकलमध्ये प्रवाशावर चाकू हल्ला; सराईत गुन्हेगार जीआरपीच्या ताब्यात, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण : मुंबईची ‘लाईफलाईन’ मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विठ्ठलवाडी ते उल्हासनगर रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये प्रवासी नितेश कुमार शहा यांच्यावर चाकूने हल्ला करून लुटीचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत नितेश शहा किरकोळ जखमी झाले असून आरोपी जोगिंदर सिंग लबाना याला जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी–उल्हासनगर दरम्यान धावत्या लोकलमधून उतरत असताना आरोपी जोगिंदर सिंग लबाना याने नितेश शहा यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने शिवीगाळ करत चाकूचा धाक दाखवत लुटीचाही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये आरोपी प्रवाशाला धमकावत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेनंतर नितेश शहा यांनी रेल्वे स्थानकावर उतरून तातडीने रेल्वे पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानंतर कल्याण आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
जोगिंदर सिंग लबाना हा उल्हासनगर परिसरातील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली असून यापूर्वीही त्याच्यावर विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून धावत्या लोकलमध्ये अशा प्रकारे चाकू हल्ला झाल्याने रेल्वे सुरक्षेवर आणि कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.