ऐरोलीत ज्वेलर्स बेपत्ता; तक्रार नोंदीअभावी गुंतवणूकदारांचे हाल

ऐरोलीत ज्वेलर्स बेपत्ता; तक्रार नोंदीअभावी गुंतवणूकदारांचे हाल

दोन महिने उलटूनही गुन्हा दाखल नाही; सुमारे ६ कोटींचा व्यवहार अडकला

पोलीस महानगर नेटवर्क 

ऐरोली : सेक्टर ३ येथील ‘भवानी ज्वेलर्स’चे मालक करणसिंग जयसिंग राजपुरोहित हे मागील दोन महिन्यांपासून कुटुंबासह बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. २८ फेब्रुवारी २०२६ पासून दुकान बंद असून संबंधितांचा मोबाईलही बंद आहे. या घटनेमुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी १ मार्च रोजी सुमारे १५ तक्रारदारांनी रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्यांची विधाने नोंदवून घेतली असली तरी अद्याप अधिकृत तक्रार (एफआयआर) दाखल न झाल्याने तक्रारदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. “वेळीच गुन्हा दाखल झाला असता तर काही धागेदोरे लागले असते,” असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

दरम्यान, या ज्वेलर्सकडे अनेकांनी दीर्घकाळ साठवलेली रक्कम व सोने अडकले आहे. एका महिलेने भावाच्या लग्नासाठी २०१३ ते २०२५ दरम्यान टप्प्याटप्प्याने पैसे जमा केले होते; मात्र लग्नाच्या वेळी रक्कम परत न मिळाल्याने तिचे आर्थिक गणित कोलमडले. आणखी एका तरुणीने सुमारे १० लाखांचे कर्ज काढून सोने बनविण्यासाठी रक्कम दिली होती; तिला ना सोने मिळाले, ना पैसे परत—उलट कर्जाचे हप्ते भरण्याची वेळ आली आहे.

याशिवाय, स्थानिक व्यापाऱ्यांचेही सोने अडकले असल्याच्या तक्रारी आहेत. एका स्वीट मार्ट व्यावसायिकाचे १० ते १२ तोळे सोने अडकल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी पुढे येत असून एकूण व्यवहार सुमारे ६ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज तक्रारदारांनी व्यक्त केला आहे.

पोलिस प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई दिसत नसल्याने तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही मदत मिळत नसल्याची खंत तक्रारदारांनी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

या प्रकरणी लवकरात लवकर गुन्हा दाखल करून तपासाला गती द्यावी, अशी मागणी तक्रारदारांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon