डोंबिवलीजवळ देसाई गावात उत्पादन शुल्क विभागाची धडक; ७.५ लाखांचा गावठी दारूसाठा जप्त, दोघे ताब्यात
पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने डोंबिवलीजवळील देसाई गावात धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची दारू जप्त केली. या कारवाईत सुमारे ७ लाख ५० हजार रुपये किमतीचा गावठी दारूसाठा हस्तगत करण्यात आला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. छाप्यात तब्बल २८०० लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. परिसरात बेकायदेशीररित्या दारू निर्मिती व साठा करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणी अधिक तपास उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येत आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.