एकाच रात्रीत ३ ऑर्केस्ट्रा बारवर धाड; सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त, ९१ जणांवर गुन्हे

एकाच रात्रीत ३ ऑर्केस्ट्रा बारवर धाड; सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त, ९१ जणांवर गुन्हे

पोलीस महानगर नेटवर्क

सोलापूर : जिल्ह्यातील ऑर्केस्ट्रा बारमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रकारांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत शुक्रवारी पहाटे एकाच वेळी तीन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत अश्लील नृत्य, वेळेचे उल्लंघन आणि पैशांची उधळण यांसारख्या प्रकारांवर अंकुश ठेवत एकूण ९१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच १ कोटी २१ लाख ८३ हजार २३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सोलापूर तालुका आणि बार्शी तालुका परिसरातील काही ऑर्केस्ट्रा बारमध्ये परवान्याच्या अटींचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले होते. ‘महाराष्ट्र अश्लील नृत्यांवर प्रतिबंध व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनियम’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथील ‘कॅसिनो ऑर्केस्ट्रा बार’वर टाकलेल्या छाप्यात ११ महिला अश्लील नृत्य करताना आढळल्या. बार मालक आणि व्यवस्थापकाच्या सूचनेनुसार हा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. येथे २३ ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले असून लॅपटॉप, साउंड सिस्टीम आणि वाहनांसह ४६.३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

खेड (ता. उत्तर सोलापूर) येथील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’मध्ये ७ महिलांकडून अश्लील नृत्य करून घेतले जात असल्याचे आढळले. पोलिसांनी १८ ग्राहकांवर कारवाई करत सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल आणि ९ वाहने जप्त केली.

दरम्यान, बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथील ‘सेन्ट्रो ऑर्केस्ट्रा बार’वर टाकलेल्या छाप्यात १८ महिला अश्लील हावभाव करताना आढळल्या. येथे ९ ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे, या ठिकाणी ५७.५१ लाख रुपयांचा मुद्देमाल आणि एक तलवारही जप्त करण्यात आली.

तिन्ही कारवायांमध्ये मिळून साउंड सिस्टीम, महागडे मोबाईल, रोख रक्कम आणि वाहनांसह एकूण १.२१ कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने समन्वय साधून पार पाडली. पुढील तपास सुरू असून संबंधित बार मालक व व्यवस्थापकांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon