फिल्मी पाठलागात साखळीचोर जेरबंद; पोलीस शिपाई रविंद्र कुऱ्हे यांचा सत्कार
रवि निषाद / प्रतिनिधी
मुंबई : घाटकोपर परिसरात साखळी चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे. पंतनगर येथील पुष्पविहार जंक्शन परिसरात ७४ वर्षीय ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकावून पळणाऱ्या आरोपींपैकी एकाला पोलिसांनी फिल्मी पाठलाग करून अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोरी मेहता या ज्येष्ठ महिला पहाटेच्या सुमारास परिसरातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या इरफान आणि मोहम्मद अली शौकत अली मिर्झा यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला. यावेळी गस्तीवर असलेले पंतनगर पोलीस ठाण्याचे शिपाई रविंद्र कुऱ्हे यांनी प्रसंगावधान राखत आरोपींचा पाठलाग सुरू केला.
काही अंतरावर धाव घेत शिताफीने त्यांनी मोहम्मद अली शौकत अली मिर्झा याला पकडले, तर दुसरा आरोपी पसार झाला. या संपूर्ण घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अटक केलेल्या आरोपीकडून चोरीला गेलेली सोन्याची साखळी जप्त करण्यात आली आहे.
या धाडसी कारवाईबद्दल पंतनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार यांनी शिपाई रविंद्र कुऱ्हे यांचा जाहीर सत्कार करून त्यांचे कौतुक केले. या कामगिरीमुळे पंतनगर पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.