हिंजवडी आयटी पार्कमध्ये ‘धर्मांतर रॅकेट’च्या आरोपांची खळबळ; कर्मचाऱ्यांकडून गंभीर तक्रारी, चौकशीची मागणी

हिंजवडी आयटी पार्कमध्ये ‘धर्मांतर रॅकेट’च्या आरोपांची खळबळ; कर्मचाऱ्यांकडून गंभीर तक्रारी, चौकशीची मागणी

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे : नाशिकमधील आयटी कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच, पुण्यातील हिंजवडीसह प्रमुख आयटी हबमध्येही अशाच प्रकारचे आरोप पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. काही आयटी कर्मचाऱ्यांनी कंपनी प्रशासनावर दुजाभाव आणि धार्मिक दबावाचे गंभीर आरोप केले असून, या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी करण्यात येत आहे.

हिंजवडी, खराडी आणि विमाननगर परिसरातील नामांकित आयटी कंपन्यांमध्ये कार्यरत काही अभियंत्यांनी आपल्या अनुभवांबाबत बोलताना, कार्यालयीन वातावरणात धार्मिक हस्तक्षेप वाढत असल्याचा दावा केला आहे. कर्मचाऱ्यांच्या मते, काही ठिकाणी मीटिंग रूम्सचा वापर विशिष्ट समुदायाच्या प्रार्थनेसाठी केला जात असून, व्यवस्थापन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे.

तसेच, सुट्ट्यांच्या बाबतीतही भेदभाव होत असल्याची तक्रार पुढे आली आहे. काही कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हिंदू सणांदरम्यान कामाचा दबाव वाढतो किंवा सुट्ट्या नाकारल्या जातात; तर विशिष्ट कालावधीत इतर समुदायांना सवलती दिल्या जातात. या प्रकारामुळे कार्यालयीन धोरणांमध्ये धार्मिक झुकाव जाणवत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, काही कर्मचाऱ्यांनी कार्यालय परिसरात धर्मप्रचार आणि मतपरिवर्तनाचे प्रयत्न होत असल्याचाही आरोप केला आहे. या सर्व प्रकारांमुळे आयटी क्षेत्रातील व्यावसायिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या आरोपांबाबत संबंधित कंपन्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. तसेच, प्रशासनानेही या प्रकरणाची स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नसून, तक्रारींची पडताळणी होणे आवश्यक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाकडे राज्यातील आयटी क्षेत्रासह प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon