अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची अपडेट; पोलिसांनी ईशानेश्वर मंदिराच्या पुजाऱ्याला उचललं

Spread the love

अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची अपडेट; पोलिसांनी ईशानेश्वर मंदिराच्या पुजाऱ्याला उचललं

योगेश पांडे / वार्ताहर

नाशिक – नाशिकमध्ये गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. विशेष तपास पथकाने मोठी कारवाई करत खरातच्या ‘ईशान्येश्वर’ मंदिराशी संबंधित तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मंदिराचा पुजारी आणि दोन कर्मचारी यांचा समावेश असून, या चौकशीमुळे प्रकरणातील अनेक धागेदोरे उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या तिघांकडून खरातच्या फार्महाऊसवर नेमक्या कोणत्या प्रकारच्या हालचाली सुरू होत्या, कोणकोणत्या कारणांसाठी लोकांना तेथे आणले जात होते, याचा तपशीलवार तपास केला जाणार आहे. त्यामुळे धार्मिक आस्था आणि ‘उपचार’ यांच्या आड नेमके काय सुरू होते? याचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास आधीच वेगाने सुरू असून, खरात आणि त्याचा निकटवर्तीय नीरज जाधव या दोघांची समोरासमोर चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीदरम्यान दोघांमध्ये पोलिसांसमोरच शाब्दिक खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. माहिती लपवण्याच्या मुद्द्यावरून हा वाद उफाळल्याचे सांगितले जात आहे. तपासात आणखी एक महत्त्वाचा धागा समोर आला आहे. नीरज जाधवच्या कॉल डिटेल रेकॉर्ड तपासात ३० ते ४० महिलांचे संपर्क क्रमांक आढळले आहेत. नीरज जाधवच महिलांना अशोक खरातचे निरोप देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फोकस प्रॉपर्टी येथे ऑफिसबॉय असताना सल्ला घेण्यासाठी येणाऱ्या महिलांच्या नीरज जाधव संपर्कात असल्याने त्याचे कारनामे आता उघड होणार आहेत.

विशेष म्हणजे, अशोक खरातची एसआयटीकडून तब्बल सात तास चौकशी करण्यात आली असून, आजही चौकशी सुरूच आहे. तपास यंत्रणा तांत्रिक पुरावे, आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींचे कनेक्शन यांचा सखोल तपास करत आहेत. या प्रकरणात आता आयकर विभागाचीही एन्ट्री झाली असून, खरातच्या मालमत्ता, कोट्यवधींचे व्यवहार, उत्पन्नाचे स्रोत आणि आयकर विवरणपत्रांची तपासणी सुरू होणार आहे. देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणाऱ्यांनाही तपासाच्या कक्षेत आणले जाणार असल्याची माहिती आहे. एकूणच, मंदिर, ट्रस्ट, फार्महाऊस आणि आर्थिक व्यवहार यांचा गुंता उलगडत असताना, या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, येत्या काळात आणखी मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon