लैंगिक शोषणाच्या खोट्या गुन्ह्याची धमकी देत प्रसिद्ध गायकाकडून खंडणी; डान्सर महिलेसह तिघांविरोधात गुन्हा

लैंगिक शोषणाच्या खोट्या गुन्ह्याची धमकी देत प्रसिद्ध गायकाकडून खंडणी; डान्सर महिलेसह तिघांविरोधात गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क

डोंबिवली : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून, प्रसिद्ध मराठी गायक आनंद शिंदे यांना लैंगिक शोषणाच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे मराठी मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, आनंद शिंदे यांनी डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. संबंधित महिला ही त्यांच्या संगीत कार्यक्रमांमध्ये डान्सर म्हणून काम करत होती. तिने लैंगिक शोषणाच्या खोट्या आरोपांची धमकी देत ५० लाख रुपये आणि पुण्यात फ्लॅटची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, डिसेंबर २०२३ पासून आरोपी महिला, तिचा भाऊ आणि आई यांनी सातत्याने छळ व खंडणी उकळण्याचा प्रकार सुरू ठेवला. आनंद शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आणि तिच्या आईशी त्यांची ओळख त्यांच्या घरी झाली होती. त्यावेळी त्यांनी डान्सर म्हणून काम देण्याची विनंती केली होती. त्यानंतर विविध कार्यक्रमांदरम्यान संबंधित महिलेची गायकासोबत ओळख वाढली.

दरम्यान, महिलेने पुण्यात आनंद शिंदे यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला. त्यानंतर तक्रार मागे घेण्यासाठी आरोपी महिलेच्या कुटुंबीयांनी ५० लाख रुपये आणि फ्लॅटची मागणी केल्याचे सांगण्यात आले. पुढील चर्चेनंतर ही रक्कम २५ लाख रुपयांवर निश्चित करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच, आरोपी महिलेने २० मे रोजी एक लाख रुपये स्वीकारले असून, २२ मे रोजी उर्वरित २४ लाख रुपयांची मागणी केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे गुन्हे शाखा करत असून, पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon