नेदरलँडहून आलेल्या २५ हजार एक्स्टसी गोळ्या उल्हासनगरात; नायजेरियन टोळीचे कनेक्शन उघड

नेदरलँडहून आलेल्या २५ हजार एक्स्टसी गोळ्या उल्हासनगरात; नायजेरियन टोळीचे कनेक्शन उघड

पोलीस महानगर नेटवर्क

उल्हासनगर : टिटवाळ्यात जप्त करण्यात आलेल्या पार्टी ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे आता थेट नेदरलँडपर्यंत पोहोचले आहेत. दक्षिण आफ्रिकेत कार्यरत असलेल्या एका नायजेरियन आरोपीने ड्रग्ज सप्लायर आमिर सय्यद याला तब्बल २५ हजार एक्स्टसी (एमडीएमए) गोळ्यांचे पार्सल नेदरलँडवरून भारतात पाठवल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे, हे पार्सल दिल्ली विमानतळावर कोणत्याही अडथळ्याविना कस्टम क्लिअरन्स होऊन पुढे कुरियरमार्फत उल्हासनगरमध्ये पोहोचल्याने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी घाटकोपर अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) आमिर सय्यद, इरफान अन्सारी, अश्विनी पॉल आणि सुफियान शेख यांना अटक केली आहे. तसेच नायजेरियन आरोपीसह त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू असून, दिल्लीतील संबंधित कुरियर कंपनीकडेही कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी २५ ऑगस्ट रोजी नेदरलँडहून २५ हजार एक्स्टसी गोळ्यांचे पार्सल कुरियरने भारतात पाठविण्यात आले. हे पार्सल २६ ऑगस्ट रोजी उल्हासनगर येथील श्री तिरुपती कुरियर सर्व्हिस प्रा. लि. मार्फत स्वीकारण्यात आले. त्यानंतर नायजेरियन आरोपीच्या सूचनेनुसार सय्यदने पनवेल, वाशी, खारघर या भागांत मोठ्या प्रमाणात या गोळ्यांचा पुरवठा केला.

यातील काही गोळ्या इरफान अन्सारीलाही पुरवण्यात आल्या होत्या. इरफानने यूपीआयद्वारे आगाऊ रक्कम अदा केल्याचे पुरावेही पोलिसांना मिळाले आहेत. याच साखळीतील पाच हजार एक्स्टसी गोळ्यांचा साठा अश्विनी पॉलच्या घरातून जप्त करण्यात आला.

मंगळवारी इरफान, सय्यद आणि अश्विनी यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात सय्यदच्या आठ दिवसांच्या वाढीव कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र, आरोपींच्या वकिलांनी त्यास विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.

दरम्यान, नेदरलँडहून दिल्ली विमानतळावर इतक्या मोठ्या प्रमाणातील ड्रग्जचे पार्सल सहजपणे कसे क्लिअर झाले, याबाबत गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित कुरियर कंपनीसह या प्रक्रियेत इतर कोणाचा सहभाग होता, याचा तपास सुरू असून, कस्टम विभागातील अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जात आहे. यासाठी एएनसीचे एक पथक चार दिवसांपूर्वीच दिल्लीला रवाना झाले आहे.

तपासादरम्यान उत्तर प्रदेशमध्येही मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा झाल्याची माहिती समोर आली आहे. सय्यदने तेथील एका साथीदारालाही मोठ्या प्रमाणात एक्स्टसी गोळ्यांचा साठा पुरवल्याचे निष्पन्न झाल्याने आणखी एक पथक उत्तर प्रदेशला रवाना करण्यात आले असून, तेथेही मोठा साठा सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon