वंचित’च्या जिल्हा संघटकाच्या वडिलांची जमावाकडून हत्या; लोखंडी रॉडने मारहाण
योगेश पांडे / वार्ताहर
डोंबिवली – डोंबिवलीजवळील घारीवली परिसरात मंगळवारी रात्री हत्येचा थरार पाहायला मिळाला. किरकोळ वादातून १० ते १५ जणांच्या टोळक्याने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक राहुल जाधव यांच्या कुटुंबावर हल्ला केला. या वादात मध्यस्थीसाठी गेलेले राहुल यांचे वडील बामा जाधव यांची लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घारीवली येथील जाधववाडी परिसरात ही घटना घडली. मंगळवारी रात्री राहुल जाधव यांचे भाऊ दिनेश यांना काही तरुणांनी फोन करून चर्चेसाठी बोलावून घेतले. दिनेश तिथे पोहोचताच दबा धरून बसलेल्या १० ते १५ जणांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला चढवला. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी धावून गेलेले वडील बामा जाधव यांच्यावरही आरोपींनी लोखंडी रॉडने भीषण प्रहार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बामा जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात ३ महिला आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. मुख्य संशयित आरोपी मयूर पाटील आणि विनोद यांच्यासह इतर टोळीचा पोलीस शोध घेत आहेत. मानपाडा पोलीस ठाण्यात खुनाचा आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हल्ला नेमक्या कोणत्या कारणावरून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पूर्ववैमनस्य की इतर काही वाद, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. एसीपी सुहास हेमाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची ओळख पटली असून लवकरच मुख्य सूत्रधारांना बेड्या ठोकल्या जातील.