शृंगारतळीतील ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न; मुंबईतील चार आरोपी अटकेत, ११.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

शृंगारतळीतील ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न; मुंबईतील चार आरोपी अटकेत, ११.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस महानगर नेटवर्क

गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत असलेल्या ज्वेलर्स दुकानात घरफोडी करण्याच्या प्रयत्नाचा छडा लावण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. या प्रकरणी मुंबईतील घाटकोपर व कुर्ला परिसरातून चार संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ११ लाख ९५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शृंगारतळी बाजारपेठेतील ‘ओंकार ज्वेलर्स’ या दुकानात १८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे १.३१ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी दुकानाचे बाहेरील शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला होता. त्यानंतर दुकानातील आतील शटर तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात घरफोडीच्या प्रयत्नाचा गुन्हा (गुन्हा क्र. ११/२०२६) भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (६), ३३१ (४) व ६२ अन्वये नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता.

तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी निशांत सुधीर आंबोकर (रा. बीएसटी कॉलनी, पंतनगर, घाटकोपर), मोईन शकील शेख (रा. गोपाल भवन, घाटकोपर), सुमित कुलदीप चुनियाना (रा. कोहिनूर सिटी, कुर्ला) आणि आयुष जितेंद्र घागडा (रा. तानसा पाईपलाईन, लक्ष्मण नगर, घाटकोपर) यांना पंतनगर, घाटकोपर परिसरातून ताब्यात घेतले.

आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले एक चारचाकी वाहन तसेच घरफोडीसाठी वापरण्यात आलेले साहित्य असा एकूण ११ लाख ९५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुहागर पोलीस ठाणे करत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलीस हवालदार विजय आंबेकर, गणेश सावंत, दिपराज पाटील, योगेश नार्वेकर तसेच चालक पोलीस शिपाई अतुल कांबळे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon