पुण्यात भररस्त्यात तडीपार गुंडाची हत्या; गंगानगरातील हल्ल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पुण्यात भररस्त्यात तडीपार गुंडाची हत्या; गंगानगरातील हल्ल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पोलीस महानगर नेटवर्क 

पुणे : शहरातील गंगानगर परिसरात भररस्त्यात एका तडीपार गुंडावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. राणा कांबळे असे मृताचे नाव असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणा कांबळे याच्यावर चोरी, मारामारीसह विविध गंभीर गुन्हे दाखल होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने त्याला काही महिन्यांपूर्वी शहरातून तडीपार केले होते. मात्र, आदेश धाब्यावर बसवून तो गंगानगर परिसरात वावरत असल्याचे समोर आले आहे.

गंगानगर परिसरात राणा कांबळे आणि ओम मोरे यांच्या गटामध्ये वर्चस्वाच्या वादातून अनेक दिवसांपासून तणाव सुरू होता. याच जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

माहितीनुसार, ओम मोरे आणि त्याच्या काही साथीदारांनी रस्त्यावर राणाला गाठले. सुरुवातीला त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर आरोपींनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने राणावर सपासप वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यात राणा गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

या संपूर्ण घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेजमध्ये काही तरुण हातात हत्यारे घेऊन पाठलाग करताना दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असतानाही भरदिवसा अशा प्रकारे हत्या घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon