पुण्यात दारूच्या नशेत तरुण-तरुणीचा पोलीस ठाण्यात धिंगाणा; महिला पोलीसाच्या हाताचा घेतला चावा, दोघांवर गुन्हा दाखल

Spread the love

पुण्यात दारूच्या नशेत तरुण-तरुणीचा पोलीस ठाण्यात धिंगाणा; महिला पोलीसाच्या हाताचा घेतला चावा, दोघांवर गुन्हा दाखल

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – दारूच्या नशेत तरुणीने महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या हाताचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील बाणेर पोलिस ठाण्यात हा संपूर्ण प्रकार घडला आहे. आत्महत्या करण्याची पोलिसांना धमकी देखील यावेळी तरूणीने दिली आहे, या तरुणीसह तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या नशेत तरुण तरुणीने पुण्यातील पोलिस ठाण्यात गोंधळ घातला.बालेवाडी येथील एका बारमध्ये मारहाण झाल्याचे सांगून बारमध्ये तसेच पोलीस ठाण्यात दारूच्या नशेत गोंधळ घातला. या प्रकरणात महिला पोलीस उपनिरीक्षक यांनी फिर्याद दिली आहे. यावरून मानसी चंपालाल परिहार्या (२४) आणि युवराज निलेश परतानी (२४) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तीन मार्च रोजी रात्री पावणे बारा ते चार मार्च पहाटे ५.३० पर्यंत सुरू होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसी ही विद्यार्थिनी असून युवराज हा मूळचा हरियाणा या राज्याच्या असून पुण्यात नोकरी करतो. दोघेही मित्र असल्याने तीन मार्च रोजी पुण्यातील बालेवाडी येथील एका रेस्टॉरंटमध्ये ते पार्टीसाठी गेले. मद्यपान केल्यानंतर दोघांना कोणीतरी मारहाण केली. यावरून त्या दोघांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला. संबंधित ठिकाणी पोहोचल्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक यांना मानसी ने “आम्हाला मारहाण झाली असून मला हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज आत्ताच पाहिजे” अशी मागणी केली. यावर हॉटेल मॅनेजर यांनी सीसीटीव्हीचे कंट्रोल युनिट मुंबईत असल्यामुळे उद्या फुटेज देतो असे सांगितले. पोलिसांनी या दोघांना पोलीस ठाण्यात येऊन तक्रार द्या असे सांगितले असता त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करायला सुरुवात केली.

या घटनेनंतर पोलीस त्या दोघांना घेऊन बाणेर पोलीस ठाण्यात आले तसेच त्यांना वैद्यकीय उपचार करण्याबाबत सांगितले असता या दोघांनी पुन्हा पोलीस ठाण्यात गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी मानसीने महिला अंमलदार यांना “तू मला विचारणारी कोण? तू माझ्याशी अशा शब्दात बोलू नको” असे बोलून गोंधळ सुरू केला. तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक यांचा युनिफॉर्म ओढून त्यांच्या हाताला चावा घेतला. “मी सुसाईड करून बाणेर पोलीस स्टेशन आणि तुम्हा सर्व पोलिसांची नावे लिहील” अशी धमकी सुद्धा यावेळी तिने दिली. दुसऱ्या बाजूला, युवराज ने सुद्धा “मी कोण आहे हे तुम्हाला दाखवून देतो माझी पावर वापरून तुमची नोकरी घालवतो,” अशी धमकी पोलिसांना दिली, दोघांनी “आम्ही उद्या सकाळी उपचार घेऊन पुन्हा पोलीस ठाण्यात येऊ” असे सांगितले. मात्र अजून पर्यंत ते दोघेही पोलीस ठाण्यात आलेले नाहीत. दरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon