ठाणे पोलीस स्कूलमध्ये सायबर गुन्हे प्रतिबंध व अमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत माहिती देण्यासाठी ठाणे पोलीस यांच्या वतीने ठाणे पोलीस स्कूल येथे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व, ऑनलाईन फसवणुकीपासून कसे सावध राहावे, तसेच सोशल मीडियाचा सुरक्षित वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘गुड टच-बॅड टच’ या विषयावरही विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने माहिती देण्यात आली.
यावेळी आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी असलेल्या ११२ हेल्पलाईनचा वापर कसा करावा याबाबतही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. तसेच समाजात पोलीस आणि नागरिक यांच्यात समन्वय वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या पोलीस मित्र उपक्रमाची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्हे, अमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि वैयक्तिक सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण झाली. शिक्षक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन भविष्यातही करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.