आठवीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा वारंवार अत्याचार, वैद्यकीय तपासणीत गर्भवती असल्याचे निष्पन्न; आरोपी शिक्षकाला अटक

Spread the love

आठवीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा वारंवार अत्याचार, वैद्यकीय तपासणीत गर्भवती असल्याचे निष्पन्न; आरोपी शिक्षकाला अटक

योगेश पांडे / वार्ताहर

अहिल्यानगर – अहिल्यानगरमधील घारगाव परिसरातील विश्वास, आधार आणि मार्गदर्शन देणाऱ्या शिक्षकाच्या भूमिकेलाच काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शाळेत एकटी राहणाऱ्या आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या आठवीतील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत शिक्षकाने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगी गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न आरोपी शिक्षक अमोल बाबासाहेब भोसले (२३) याला अटक करण्यात आली असून गुन्हा घारगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी ग्रामीण भागातील खासगी माध्यमिक शाळेत शिक्षण घेत आहे. घरातील परिस्थितीमुळे ती नेहमी एकटी आणि विचारमग्न राहत असे. वडील कामानिमित्त बाहेर, भाऊ कॉलेजला, आणि आई घरकामात व्यस्त या सगळ्यामुळे मुलीला उपेक्षित असल्याची भावना निर्माण झाली होती. याच मानसिक अवस्थेचा फायदा घेत शिक्षक भोसले याने तिच्याशी संवाद साधत जवळीक वाढवली. सातवीत असतानापासूनच तो तिच्याशी मैत्री करत होता. पुढे आईच्या मोबाईलवरून संपर्क साधत त्याने तिला प्रेमाचे संदेश पाठवले. भावनिक आधार देण्याच्या नावाखाली त्याने तिच्या मनात विश्वास निर्माण केला.

फिर्यादीनुसार, डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत मुलगी घरी एकटी असताना आरोपी तिच्या घरी जात असे आणि तिच्यावर वारंवार अत्याचार करत असे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नव्हता. काही दिवसांपूर्वी मुलीला पोटदुखीची तक्रार सुरू झाली. उपचारासाठी तिला पिंपरी-चिंचवड येथील रुग्णालयात नेण्यात आले असता ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर प्रकरणाचा भांडाफोड झाला.

या प्रकरणी आरोपीवर भारतीय न्यायसंहितेतील संबंधित कलमे तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झिरो क्रमांकाने गुन्हा नोंदवून तपास घारगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.शिक्षकानेच विद्यार्थिनीचा विश्वासघात केल्याने संगमनेर तालुक्यात संताप व्यक्त होत आहे. शिक्षक म्हणजे आदर्श ही संकल्पनाच या घटनेने हादरली आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon