मुंबईत परदेशी महिलेची छेड काढणं भोवलं; त्या’ रोडरोमिओला अखेर बेड्या

Spread the love

मुंबईत परदेशी महिलेची छेड काढणं भोवलं; त्या’ रोडरोमिओला अखेर बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबईतील धोबीघाट परिसरात परदेशी महिलेची छेड काढल्याचा प्रकार अलीकडेच समोर आला आहे. या घटनेमुळे शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आयनस फारिया नावाची पोर्तुगीज कंटेंट क्रिएटर भारत भ्रमंतीसाठी आली होती. मुंबईतील प्रसिद्ध धोबीघाट परिसरात फिरत असताना दोन तरुणांनी तिच्याकडे वारंवार सेल्फी घेण्याचा आग्रह धरला. ‘प्लीज, एकदा, एक सेल्फी… दोन सेकंद नाही लागणार…’ असे म्हणत ते तरुण तिचा सतत पाठलाग करत असल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येते.

फारियाने अनेकदा नकार दिल्यानंतरही संबंधित तरुण तिच्या मागे लागले होते. २२ फेब्रुवारी रोजी घडलेला हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली. महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करत अनेकांनी मुंबई पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली. या व्हिडीओची दखल घेत मुंबई पोलिसांनी तत्काळ आयनस फारियाशी संपर्क साधला. मेसेजद्वारे तिचा पत्ता आणि संपर्क तपशील मागवून पोलिसांनी संपूर्ण माहिती गोळा केली. फारियानेही पोलिसांना पूर्ण सहकार्य करत घडलेला प्रकार सविस्तरपणे सांगितला.

त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेला आरोपी परराज्यातील असून तो कामानिमित्त मुंबईत राहत असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आरोपींचे नेमके उद्देश आणि यामागील पार्श्वभूमी तपासली जात आहे.

या घटनेमुळे मुंबईसारख्या महानगरातही परदेशी तसेच स्थानिक महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा किती गंभीर आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. पर्यटकांची संख्या वाढत असताना अशा घटनांमुळे शहराची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनीही जबाबदारीचे भान राखून वर्तन करणे तितकेच आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon