चेंबूरमध्ये निर्माणाधीन इमारतीत पार्किंग स्लॅब कोसळला; एक कामगार ठार, पाच गंभीर जखमी
रवि निषाद / मुंबई
मुंबई : चेंबूरमधील सुभाषनगर परिसरात एन. जी. आचार्य मार्गावर सुरू असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीत शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. इमारतीच्या पार्किंगचा स्लॅब अचानक कोसळल्याने सहा कामगार खाली पडले. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
सुभाषनगर येथील इमारत क्रमांक ३६च्या पुनर्विकासाचे काम सुरू असताना हा अपघात घडला. काम सुरू असतानाच पार्किंग स्लॅबचा भाग कोसळला आणि त्याखाली काम करणारे सहा कामगार थेट खाली पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व आपत्कालीन सेवांच्या पथकाने तातडीने बचावकार्य राबवले. जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.
या दुर्घटनेत रामनजेनेल्लु हणुमंता देशपोगु (५५) यांचा मृत्यू झाला आहे. तर गुणाधर रॉय (२२), कुस रॉय (३०), विजयकुमार मेवालाल मौर्या (३५), संदीप रॉय (२७) आणि रमेश रॉय (२५) हे पाच कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून चौकशी सुरू असून तपासादरम्यान आणखी आरोपींचा समावेश होण्याची शक्यता आहे, अशी माहिती परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी दिली.