महिलांना लोकलमध्ये आता संकटात लगेच मिळणार मदत; पश्चिम रेल्वे आरपीएफचा ‘सखी’ विशेष व्हॉट्सअप उपक्रम सुरू

Spread the love

महिलांना लोकलमध्ये आता संकटात लगेच मिळणार मदत; पश्चिम रेल्वे आरपीएफचा ‘सखी’ विशेष व्हॉट्सअप उपक्रम सुरू

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – आता लोकलमध्ये प्रवास करताना काही संकट आलं, तर घाबरून जाण्याची गरज नाही. चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो महिला प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे सुरक्षा बलाने महिलांच्या सुरक्षेसाठी ‘सखी’ हा विशेष व्हॉट्सअप उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून महिला प्रवासी थेट आरपीएफच्या महिला अधिकाऱ्यांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्यांना आता अवघ्या काही मिनिटांत मदत मिळणार आहे.

चर्चगेट ते डहाणू या पट्ट्यात एकूण ११ व्हॉट्सअप ग्रूप्स तयार करण्यात आले आहेत. या ग्रूपचे नेतृत्व महिला उपनिरीक्षक किंवा सहाय्यक महिला उपनिरीक्षक करत आहेत. महिला प्रवाशाने छेडछाड, चोरी किंवा पुरुषांच्या घुसखोरीबाबत फोटो आणि स्थानकाचे नाव ग्रूपवर टाकल्यास, पुढच्या एक-दोन स्थानकांतच आरपीएफचे जवान मदतीसाठी डब्यात हजर होतील. या उपक्रमात आतापर्यंत १५०० हून अधिक नियमित महिला प्रवासी सहभागी झाल्या आहेत.

केवळ तांत्रिक मदतच नाही, तर आरपीएफने प्रत्यक्ष कारवाईचाही बडगा उगारला आहे. गेल्या सहा महिन्यांत महिलांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्या ६,१९५ पुरुषांवर रेल्वे कायद्याच्या कलम १६२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या घुसखोरांकडून तब्बल १३ लाख ८४ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वे सुरक्षा आयुक्त रजत कुंडगीर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. रेल्वेची ‘१३९’ ही हेल्पलाईन सेवा सुरू असली, तरी व्हॉट्सअप ग्रूपमुळे फोटो आणि लोकेशन शेअर करणे सोपे झाल्याने गुन्हेगारांना पकडणे अधिक सुलभ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon