कल्याण पश्चिमेतील हायप्रोफाईल सोसायटीत निवृत्त डीसीपी ची दादागिरी; दारूच्या नशेत महिलेचा विनयभंग, चारित्र्यहनन आणि मारहाणीचा गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण पश्चिमेतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका निवृत्त पोलीस उपायुक्ताने (डीसीपी) दारूच्या नशेत धुमाकूळ घातल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या निवृत्त अधिकाऱ्याने महिलांशी अश्लील वर्तन करत त्यांचा विनयभंग केला असून, सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनाही बेदम मारहाण केली आहे. ही सर्व धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास वल्लभ टॉवर येथे ही घटना घडली. सोसायटीत राहणारी एक महिला आपल्या लहान मुलासह दुचाकीवरून बाहेर जाण्यासाठी पार्किंगमध्ये आली होती. यावेळी तिथेच राहणारे निवृत्त पोलीस अधिकारी बी. एल. पवार यांनी मुद्दाम आपली चारचाकी त्या महिलेच्या दुचाकीमागे उभी केली. महिलेने वारंवार हॉर्न वाजवून गाडी बाजूला घेण्याची विनंती केली, मात्र पवार यांनी गाडी हटवली नाही. उलट, त्या महिलेकडे अश्लील नजरेने पाहत तिचे चारित्र्यहनन करणारे शब्द वापरले आणि तिच्या पायाला गाडीचा धक्का लावून शिवीगाळ सुरू केली.
या वादाचा आवाज ऐकून सोसायटीचे रहिवासी आणि पदाधिकारी घटनास्थळी जमा झाले. जेव्हा त्यांनी निवृत्त अधिकाऱ्याला समजवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी अधिकच आक्रमक होत सर्वांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी सोसायटीच्या सेक्रेटरीचे कान पकडून त्यांना मारहाण केली, तर चेअरमनना धक्काबुक्की केली. उपस्थित महिलांनी विरोध केला असता, आरोपीने त्यांच्याशीही असभ्य चाळे करत विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
निवृत्त अधिकाऱ्याच्या या ‘दबंगगिरी’चे सर्व फुटेज सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आहे. यामध्ये ते रहिवाशांना मारहाण करताना आणि महिलांशी गैरवर्तन करताना स्पष्टपणे दिसत आहेत. घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी महात्मा फुले पोलीस ठाणे गाठले. एका माजी उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यानेच अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन केल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांनी याप्रकरणी विनयभंग, मारहाण आणि शिवीगाळीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. एका निवृत्त जबाबदार अधिकाऱ्याचे हे वागणं सध्या कल्याणात चर्चेचा विषय ठरले आहे.