पत्नीला भावासोबत रंगेहाथ पकडलं; संतापलेल्या बायकोने पतीवरच केला जीवघेणा हल्ला
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील गोवंडी परिसरात एका ३८ वर्षीय मजुराने आपल्या पत्नीला मामेभावासोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडले. आपलं पितळ उघड झाल्याच्या रागातून पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून पतीवर चाकूने हल्ला करून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून त्याच्या हाताचा अंगठा छाटला गेला.
पीडित व्यक्ती व्यवसायाने मजूर असून तो रविवारी नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. दुपारी कामाच्या ठिकाणी घराच्या चावीची गरज पडल्याने तो अचानक घरी परतला. घरी पोहोचल्यावर त्याला दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले आणि घराबाहेर एक अनोळखी चप्पल पडलेली दिसली. संशय आल्याने त्याने खिडकीतून आत डोकावून पाहिले असता, त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याची पत्नी आणि जवळच राहणारा त्याचा मामेभाऊ आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचे त्याला दिसले.
पतीने दरवाजा वाजवून दोघांना रंगेहाथ पकडल्यानंतर घरात मोठा गदारोळ झाला. पकडले जाण्याच्या भीतीने आरोपी भावाने तिथून पळ काढला. आपला स्वतःचा भाऊ आणि पत्नीने असा विश्वासघात केल्याने पतीला मोठा मानसिक धक्का बसला.
खरे नाट्य रविवारी रात्री घडले. आरोपी पत्नीने हा वाद मिटवण्यासाठी पती आणि तिच्या प्रियकर भावाला पुन्हा घरी बोलावले. चर्चा सुरू असताना वादाचे रूपांतर भांडणात झाले. यावेळी आरोपी भावाने अचानक चाकू काढून पतीच्या छातीवर वार करण्याचा प्रयत्न केला. पतीने स्वतःचा बचाव करण्यासाठी हात पुढे केला असता, चाकूने त्याच्या उजव्या हाताचा अंगठा कापला गेला आणि बोटांना गंभीर दुखापत झाली.
पती जीव वाचवून पळण्याच्या प्रयत्नात असताना, पत्नीनेही क्रूरतेचा कळस गाठला. तिनेही चाकूने पतीच्या डाव्या मांडीवर खोलवर वार केले. कसाबसा जीव वाचवून हा मजूर घराबाहेर पडला. सुरुवातीला स्थानिक दवाखान्यात दाखवल्यानतंर प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.गोवंडी पोलिसांनी याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या दोन्ही आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.