अजित पवारांच्या अपघाती निधनाची सीबीआय चौकशी व्हावी; राष्ट्रवादी नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची सखोल व पारदर्शक चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) करण्यात यावी, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, मंत्री हसन मुश्रीफ तसेच पार्थ पवार यांचा समावेश होता. या भेटीनंतर सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना, “अजित पवारांच्या अपघाती निधनासंदर्भातील सर्व बाबींची स्वायत्त संस्थेमार्फत चौकशी व्हावी, यासाठी आम्ही सीबीआय तपासाची मागणी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात राज्य सरकारकडून केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्रव्यवहार केला जाईल, असे आश्वासन दिले आहे,” असे सांगितले.
सीबीआय तपासामुळे प्रकरणाचा अधिक व्यापक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही तपास होऊ शकतो, असे नमूद करत तटकरे म्हणाले की, “स्वायत्त यंत्रणेमार्फत तपास झाल्यास सर्व संशयित मुद्द्यांचा समावेश करून निष्कर्ष लवकरात लवकर देशासमोर मांडता येईल. हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठाम भूमिका आहे.”
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही सुनील तटकरे यांची भेट घेतली. या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना तटकरे म्हणाले की, ही चर्चा आगामी जिल्हा परिषद निवडणुकांतील संख्याबळ आणि संभाव्य समन्वयाबाबत होती. “भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची भूमिका काय असू शकते, यावर सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली. मित्रपक्ष म्हणून परस्पर सन्मान राखून संवाद झाला,” असेही त्यांनी स्पष्ट केले.