डोंबिवलीतील अग्नीकांड अपघाती नव्हे; इमारतीतीलच तरुण अटकेत

Spread the love

डोंबिवलीतील अग्नीकांड अपघाती नव्हे; इमारतीतीलच तरुण अटकेत

योगेश पांडे / वार्ताहर

डोंबिवली : सागाव परिसरातील रविकिरण सोसायटीत लागलेल्या भीषण आगीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून ही आग अपघाती नसून मुद्दाम लावण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. डोंबिवली येथील या घटनेचा छडा लावत मानपाडा पोलिसांनी इमारतीत राहणाऱ्या लवेश पार्टे (वय २३) या तरुणाला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

दोन दिवसांपूर्वी पहाटे साडेचारच्या सुमारास सागाव येथील राज अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये अचानक आग लागली होती. सुरुवातीला हा शॉर्ट सर्किटचा प्रकार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, मानपाडा पोलीस ठाणे पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, लवेश पार्टे हा पहाटेच्या वेळी घरातून खाली येऊन पार्किंगमधील कचरा पेटीत काहीतरी ज्वलनशील वस्तू टाकताना दिसून आला. त्यानंतर काही सेकंदांतच कचरा पेटीने पेट घेतला आणि आगीने रौद्र रूप धारण केले.

आगीची तीव्रता इतकी होती की पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तब्बल २९ दुचाकी जळून खाक झाल्या. धूर आणि ज्वाळांमुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. या घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यात एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. त्या महिलेची दोन लहान मुलेही आगीच्या विळख्यात सापडून जखमी झाली. अग्निशमन दलाने वेळेत धाव घेत आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.

सीसीटीव्ही पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी लवेश पार्टे याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीने कचरा पेटीत नेमकी कोणती वस्तू टाकली आणि या कृत्यामागील त्याचा उद्देश काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon