जिमखाना स्वायत्तता व हॉस्टेल सुविधांसाठी जे. जे. समूह रुग्णालयमधील निवासी डॉक्टरांचे आमरण उपोषण
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक जे. जे. समूह रुग्णालय (ग्रँट मेडिकल कॉलेज) मधील निवासी डॉक्टरांनी जिमखान्याची स्वायत्तता, वसतिगृहातील मूलभूत सुविधांचा अभाव, अपुरी सुरक्षा आणि थकीत पगार–विद्यावेतन या मागण्यांसाठी सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी सुमारे २०० डॉक्टर आंदोलनात सहभागी झाल्याने बाह्यरुग्ण सेवा आणि नियोजित शस्त्रक्रियांवर परिणाम झाला आहे.
प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करूनही ठोस प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. “लेखी आश्वासन आणि ठोस कृती होईपर्यंत उपोषण सुरू राहील,” असे डॉक्टर असोसिएशनचे सरचिटणीस ऋषिकेश शिंदे यांनी स्पष्ट केले. रुग्णसेवा सुरळीत ठेवण्यासाठी वरिष्ठ डॉक्टरांना कामावर राहण्याचे आदेश देण्यात आले असले, तरी प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून तोडगा निघतो का, याकडे लक्ष लागले आहे.