उल्हासनगरमध्ये सावकाराची दहशत; व्याजाच्या वादातून तरुणाचे अपहरण, लॉजमध्ये अमानुष छळ

Spread the love

उल्हासनगरमध्ये सावकाराची दहशत; व्याजाच्या वादातून तरुणाचे अपहरण, लॉजमध्ये अमानुष छळ

पोलीस महानगर नेटवर्क

उल्हासनगर : व्याजाच्या पैशांवरून सावकाराने केलेल्या गुंडगिरीची धक्कादायक घटना उल्हासनगर येथे उघडकीस आली आहे. व्याजाची रक्कम न दिल्याच्या रागातून एका ३० वर्षीय तरुणाचे भरदिवसा अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर लॉजमध्ये डांबून अमानुष छळ करत अर्धनग्न अवस्थेत व्हिडिओ चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाणे येथे चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी चिराग मीरचंदानी (वय ३०) हे अंबरनाथ पूर्व येथील आश्रय आनंद इमारतीत कुटुंबासह राहतात. त्यांनी आरोपी सावकार अमित चागुला याच्याकडून चार लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यापैकी दोन लाख ५० हजार रुपये परत केले असतानाही आरोपीकडून चार लाख ५० हजार रुपयांची मागणी करण्यात येत होती. वाढत्या व्याजामुळे उर्वरित रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी कट रचल्याचा आरोप आहे.

९ फेब्रुवारीच्या रात्री कॅम्प क्रमांक ५ परिसरातील एका चायनीज सेंटरमध्ये जेवत असताना आरोपींनी लोखंडी पाइपने चिराग यांना मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्यांना बदलापूर येथील एका कार्यालयात नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आली. पुढे त्यांना माथेरान येथे नेऊन एका लॉजमध्ये कोंडून ठेवण्यात आले. तेथे नग्न करून मारहाण करत व्हिडिओ तयार करण्यात आला. पैसे न दिल्यास गुप्तांग कापण्याची धमकी देण्यात आली. तसेच बहिणीबाबत अश्लील व अवमानकारक वक्तव्य करत पैशांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

अखेर आरोपींच्या सांगण्यावरून कैलासनगर परिसरातील एका व्यक्तीकडे एक लाख २५ हजार रुपये जमा केल्यानंतर चिराग यांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी अमित चागुला, कमल नागदेव आणि त्यांच्या दोन साथीदारांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon