१०० दिवसांच्या कृती आराखड्यातून ठाणे पोलिसांचा ‘तक्रार निवारण दिन’; ५३३ अर्जदारांची प्रत्यक्ष सुनावणी

Spread the love

१०० दिवसांच्या कृती आराखड्यातून ठाणे पोलिसांचा ‘तक्रार निवारण दिन’; ५३३ अर्जदारांची प्रत्यक्ष सुनावणी

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : नागरिकांच्या तक्रारींना तत्काळ न्याय देण्याच्या उद्देशाने ठाणे पोलीस आयुक्तालय येथे १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत दोन दिवसीय तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला. दिनांक १४ व १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या या उपक्रमात एकूण ७८१ अर्जदारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी ५३३ अर्जदार प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांनी आपल्या तक्रारी मांडल्या.

या तक्रार निवारण दिनात ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. अर्जदारांच्या तक्रारींची प्रत्यक्ष सुनावणी करून तब्बल ४५६ अर्जांची जागेवरच निर्गती करण्यात आली. उर्वरित अर्जदारांनाही पुढील कालावधीत बोलावून त्यांच्या तक्रारींचे निरसन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नागरिकांना प्रत्यक्ष समोरासमोर बोलावून तक्रारी ऐकून घेणे, तत्काळ कारवाई करणे आणि स्पष्ट निर्णय देणे, ही या उपक्रमाची वैशिष्ट्ये ठरली. या प्रक्रियेमुळे अनेक अर्जदारांच्या प्रलंबित तक्रारींना दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून आले.

ठाणे शहर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि संवेदनशीलतेबद्दल अर्जदारांनी समाधान व्यक्त केले असून, पोलिस प्रशासनाचे विशेष आभार मानले आहेत, अशी माहिती शैलेश साळवी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon