मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात लिपिकाला लाच घेताना पकडल्यानंतर आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी विभागातील दक्षता पथकाला चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. लाचखोर लिपीक राजेंद्र ढेरंगे याची चौकशी करून बंद लिफाफ्यात त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश झिरवाळ यांनी दिले आहेत.
नरहरी झिरवाळ यांनी लाचखोर ढेरंगे याची विभागातील प्रतिनियुक्ती रद्द करून पुन्हा अन्न व नागरी पुरवठा विभागात पुन्हा पाठविण्याची विनंती सामान्य प्रशासन विभागाला केल्याची माहिती समोर आली आहे. विभागातील लिपीक ढेरंगे याला गुरुवारी ३५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. ढेरंगे याच्या अटकेनंतर विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्यावर टीकेची झोड उठली असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती, त्याचबरोबर राजीनामा देण्याचा दबाव टाकण्यात येत आहे.
नरहरी झिरवळ यांनी संपूर्ण प्रकरणाची गोपनीय चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने एका मराठी वृत्तसंस्थेने दिले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील सहआयुक्त (दक्षता) तसेच संबंधित पोलिस उपायुक्त यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी अहवाल बंद लिफाफ्यात शक्य तितक्या लवकर सादर करावा, असे निर्देश मंत्र्यांनी दिले. दरम्यान, ढरंगे यांची प्रतिनियुक्ती तत्काळ रद्द करण्याबाबत आदेश जारी करण्याची विनंती मंत्री झिरवळ यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे केली आहे.
माझ्या विभागातील क्लार्क लाच प्रकरणात सापडला ही माझीही जबाबदारी आहेच, ही जबाबदारी नाही म्हणून चालणार नाही. त्याने जे कृत्य केलंय, त्या कृत्याला आम्ही पाठीशी घालणार नाही. या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि चौकशीत जर या प्रकरणाचे धागेदोरे माझ्यापर्यंत आले तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन,” असंही नरहरी झिरवळ यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं. तसंच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून या सर्व प्रकरणाविषयी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे, अशी माहितीही झिरवळ यांनी दिली होती.