‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत आरपीएफची तत्परता; रक्सौल एक्सप्रेसमधील प्रवाशाचा जीव वाचवला
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ मोहिमेंतर्गत (आरपीएफ) एलटीटी पोस्टवरील उपनिरीक्षक आर. पी. वंजारी आणि प्रधान आरक्षक सचिन साबने यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून एका प्रवाशाचा जीव वाचला आहे.
वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त, मुंबई आणि सहायक सुरक्षा आयुक्त, दादर यांच्या निर्देशानुसार व निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली १४ फेब्रुवारी २०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ट्रेन क्रमांक १२५४६ रक्सौल एक्सप्रेसच्या बंदोबस्त ड्युटीदरम्यान ही घटना घडली. सायंकाळी सुमारे ३.३८ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर गाडी येत असताना, कुंदन कुमार (वय २२, रा. चिचरी कानूनगो, जि. मधुबनी, बिहार) हा प्रवासी चालत्या गाडीत दरवाजा उघडून चढण्याचा प्रयत्न करत होता.
दरम्यान त्याचा तोल गेल्याने तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये पडला. ही बाब लक्षात येताच घटनास्थळी उपस्थित उपनिरीक्षक वंजारी आणि प्रधान आरक्षक साबने यांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेऊन प्रवाशाला सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
यानंतर प्रवाशाची चौकशी करून दुखापत किंवा वैद्यकीय मदतीची गरज आहे का, याची खात्री करण्यात आली. कोणतीही गंभीर दुखापत नसल्याचे प्रवाशाने सांगितले. खबरदारी म्हणून त्याला आरपीएफ पोस्टवर प्राथमिक उपचार देण्यात आले आणि नंतर त्याला पुन्हा सुरक्षितरीत्या रक्सौल एक्सप्रेसमध्ये बसवून त्याच्या गंतव्याकडे रवाना करण्यात आले.
आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या या कर्तव्यनिष्ठ व प्रशंसनीय कार्याबद्दल प्रवाशाने आभार व्यक्त केले असून, सदर घटनेची माहिती वरिष्ठांना सादर करण्यात आली आहे.