जागा खरेदीचे आमिष; १.१० कोटींची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : मुळशी तालुक्यातील जांबे येथे जागा खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल १ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २०११ ते १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी राजेंद्र कोंडीबा शितोळे (रा. जांबे, ता. मुळशी, जि. पुणे) आणि हिरामण ज्ञानोबा वाजे (रा. ओंकार कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) अशी आरोपींची नावे असून, तुषार आत्माराम कलाटे (४५, रा. दत्त मंदिराजवळ, वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी कलाटे व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे होते. आरोपींनी मुळशी तालुक्यातील जांबे येथे जागा खरेदी करून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी २०११ पासून वेळोवेळी रोख तसेच खात्यामार्फत रक्कम स्वीकारली. मात्र, नंतर न जागा मिळाली, न घेतलेली रक्कम परत करण्यात आली. आरोपींनी संगनमत करून एकूण १ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असून, आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे तपासली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.