स्पाच्या आड देहविक्रीचा धंदा; हडपसरमधील ‘व्हाईट पर्ल स्पा’वर गुन्हे शाखेची धडक
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) हडपसर परिसरात मोठी कारवाई करत स्पाच्या आड सुरू असलेला देहविक्री व्यवसाय उघडकीस आणला. हडपसर गाडीतळ येथील ‘व्हाईट पर्ल स्पा’वर टाकलेल्या छाप्यात तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई हडपसर गाडीतळ परिसरातील दशमेश कॉम्पलेक्समधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या ‘व्हाईट पर्ल स्पा’मध्ये करण्यात आली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला असता स्पामध्ये देहविक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तात्काळ छापा टाकून तीन महिलांची सुटका करण्यात आली.
या प्रकरणी स्पा मॅनेजर सौरभ शामराव इंगळे (वय २८) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे शहर गुन्हे शाखा अंतर्गत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केली असून, अमितेश कुमार (पोलीस आयुक्त), रंजनकुमार शर्मा (सह पोलीस आयुक्त) तसेच गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
शहरात स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.