पुण्याचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला कल्याणमध्ये अटक; इराणी वस्तीत पिंपरी चिंचवड आणि खडकपाडा पोलिसांवर हल्ला

Spread the love

पुण्याचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला कल्याणमध्ये अटक; इराणी वस्तीत पिंपरी चिंचवड आणि खडकपाडा पोलिसांवर हल्ला

योगेश पांडे / वार्ताहर

कल्याण – कल्याणच्या इराणी वस्तीत रंगलेल्या थरारनाट्यामध्ये पुण्याचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकला. एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे पिंपरी चिंचवड आणि खडकपाडा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई पूर्ण केली. पुणे पोलिसांना गुंगारा देणारा हा सराईत चोरटा अखेर खाकी वर्दीच्या कचाट्यात सापडला असून या कारवाईने गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्यातील एका गंभीर गुन्ह्यात फरार असलेला मोहंमद कवर इराणी हा कल्याणमधील आपल्या मूळ परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती पिंपरी चिंचवड क्राईम ब्रांच युनिट २ ला मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी विलंब न लावता थेट कल्याण गाठले. तेथील स्थानिक खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्याशी संपर्क साधून मदतीची मागणी केली. दोन्ही पथकांनी मिळून इराणी वस्तीत सापळा रचला आणि मोहंमदला घेरले.

ज्यावेळी पोलीस मोहंमदला ताब्यात घेण्यासाठी त्याच्या घरापर्यंत पोहोचले, त्यावेळी तिथे प्रचंड गोंधळ निर्माण झाला. आपला नातेवाईक पोलिसांच्या तावडीत सापडत असल्याचे पाहून त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांवर थेट हल्ला चढवला. विशेषतः महिला नातेवाईक आरोपीला सोडवण्यासाठी पुढे आल्या आणि त्यांनी पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.

आरोपीला पळवून लावण्याच्या उद्देशाने त्यांनी पोलिसांशी झटापट केली, मात्र पोलिसांनी अतिशय संयमाने आणि धैर्याने परिस्थिती हाताळली.नातेवाईकांचा तीव्र विरोध झुगारून पोलिसांनी मोहंमद कवर इराणी याला शिताफीने पकडले आणि तातडीने गाडीत टाकून खडकपाडा पोलीस ठाणे गाठले. मोहंमदचा गुन्हेगारी इतिहास मोठा असून पुणे पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या शोधात होते.या कारवाईमुळे एका मोठ्या गुन्हेगाराला गजाआड करण्यात यश आले आहे. खडकपाडा आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी दाखवलेल्या या शौर्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon