सांताक्रूझमध्ये अल्पवयीन मुलीचा पाठलाग; रिक्षाचालकाविरुद्ध वाकोला पोलिसांत गुन्हा

Spread the love

सांताक्रूझमध्ये अल्पवयीन मुलीचा पाठलाग; रिक्षाचालकाविरुद्ध वाकोला पोलिसांत गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : सांताक्रूझ (पश्चिम) परिसरात रिक्षातून उतरलेल्या अल्पवयीन मुलीचा रिक्षाचालकाने पाठलाग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी सांताक्रूझ पश्चिम भागातून रिक्षाने प्रवास करत होती. ठरलेल्या ठिकाणी रिक्षातून उतरून ती पायी निघाली असता, चालकाने रिक्षा थांबवून तिच्या मागोमाग जाण्यास सुरुवात केली. रिक्षातून उतरल्यावरही पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच मुलगी घाबरली. भीतीच्या अवस्थेत तिने तात्काळ हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला.

यानंतर पालकांनी वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. त्याच्या आधारे रिक्षाचा क्रमांक आणि चालकाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा वारंवार ऐरणीवर येत असताना, गजबजलेल्या आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सांताक्रूझसारख्या भागात अल्पवयीन मुलीचा पाठलाग झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon