डोंबिवलीत प्राणीमित्र महिलेवर हल्ला; विनयभंग करून दुचाकीस्वार पसार, मानपाडा पोलिसांत गुन्हा

Spread the love

डोंबिवलीत प्राणीमित्र महिलेवर हल्ला; विनयभंग करून दुचाकीस्वार पसार, मानपाडा पोलिसांत गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क

डोंबिवली : रस्त्यावरील कुत्र्याच्या पिल्लाला दुचाकीने ठोकर देऊन त्यानंतर मारहाण करणाऱ्या दुचाकीस्वाराला जाब विचारल्याने ३५ वर्षीय प्राणीमित्र महिलेवर हल्ला करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी नांदिवली टेकडी परिसरात घडली. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी अनोळखी दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे १०.३० वाजता संबंधित महिला नांदिवली टेकडी परिसरातून पायी जात असताना एमएच ०५/ईसी/२६१७ क्रमांकाच्या दुचाकीवरील अनोळखी व्यक्तीने रस्त्यावरील कुत्र्याच्या पिल्लाला धडक दिली. त्यानंतर त्या पिल्लाला जवळील शालेय दप्तराने मारहाण करण्यास सुरुवात केली.

हा अमानुष प्रकार पाहून महिलेने संबंधित व्यक्तीला जाब विचारला. मात्र, “माझ्या भानगडीत पडू नका, पिल्लू तुमचे नाही. मी याला मारून टाकीन किंवा काहीही करीन,” असे धमकावत आरोपीने मारहाण सुरूच ठेवली. आरोपी ऐकत नसल्याने महिलेने त्याला जाब विचारत ‘हा माणूस वेडा आहे का?’ असा सवाल केला.

यामुळे संतप्त झालेल्या दुचाकीस्वाराने महिलेच्या तोंडावर थप्पड मारून अश्लील शिवीगाळ केली. पुढे अश्लील चाळे करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे. महिलेने प्रतिकार केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाला.

घटनेनंतर भयभीत झालेल्या महिलेने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने दखल घेत शिवीगाळ, मारहाण आणि विनयभंगाच्या कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीत नमूद दुचाकी क्रमांकाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon