नवी मुंबईतील पोलिसदलातील हवालदार निघाला हत्यारा !

Spread the love

नवी मुंबईतील पोलिसदलातील हवालदार निघाला हत्यारा !

मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तरूणाची हत्या; पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर

सातारा – खंडाळा तालुक्यातील सुखेड गावच्या हद्दीतील विहिरीत अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणंद पोलिसांनी ७२ तासात या प्रकरणाचे गूढ उकलत चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तरूणाची हत्या केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.

खंडाळा तालुक्यातील सुखेड गावातील एका विहिरीत २५ ते ३० वर्षे वयाच्या अनोळखी तरूणाचा अर्धवट जळालेला मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृताचे सोमनाथ कल्याण बोबडे (२०) असल्याचे निष्पन्न झाले. घातपाताची घटना असल्याने लोणंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. फलटणचे डीवायएसपी विशाल खांबे, सातारा एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या पथकाने सलग तपास करत हा गुन्हा उघडकीस आणला.

सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एका संशयित कारचा शोध लावला. सलग तीन दिवसांच्या अहोरात्र तपासा संशयितांनी तरूणाची कळंबोली येथे नियोजनपूर्वक कट रचून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी बंडू बापू भिसे, विजय पोपटराव पवार, किरण विकास गायकवाड आणि श्रीनिवास ज्ञानेश्वर लोणे या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

संशयित आरोपींनी सोमनाथ बोबडे याला कळंबोली येथे जबरदस्तीने होंडा सिटी कारमध्ये (एमएच -१२ डीवाय ८८४६) बसवून दोरीने हातपाय बांधले. गाडीतच त्याचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह सुखेड येथे आणून पेट्रोल टाकून पेटवला. अर्धवट जळालेला तो मृतदेह विहिरीत टाकला. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी विहिरीत मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर ७२ तासात हत्येचा छडा लावून चौघांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं.

मुख्य आरोपी बंडू बापू भिसे (४९) हा नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत आहे. तो मूळचा फलटण तालुक्यातील दुधेबावी गावचा आहे. भिसे याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. मृत सोमनाथ बोबडे याचेसुद्धा त्या महिलेशी संबंध जुळल्याने दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. भिसे याचे काही फोटो व व्हिडीओ बोबडेच्या हाती लागल्याने तो भिसेला ब्लॅकमेल करत होता. या त्रासाला कंटाळून भिसे याने सोमनाथ बोबडेचा काटा काढण्याचा कट रचला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon