अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या किन्नर समाजाच्या गद्दीपतींवर गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – नाशिकमधून एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला असून, किन्नर समाजाच्या गद्दीपती सलमा नायक यांच्यासह एका तरुणावर खंडणी आणि धमकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नग्न अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत धर्मांतरासाठी दबाव टाकणे आणि त्यास नकार दिल्यास तब्बल १५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित अब्दुल जलालउद्दीन शेख आणि त्याची गुरू असल्याचे सांगितले जाणारी सलमा नायक यांच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पंचवटीतील गजानन चौक परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय युवकाची ओळख सन २०२० मध्ये एका तरुणाच्या माध्यमातून ‘पार्वती’ नावाने ओळख करून देण्यात आलेल्या व्यक्तीशी झाली. ही व्यक्ती किन्नरासारखा वेश परिधान करत होती आणि कालिकानगर परिसरात राहत होती. संबंधित ठिकाणी देवीचा दरबार भरवला जात असल्याने, ओळखीच्या माध्यमातून युवकाचे त्या घरी येणे-जाणे सुरू झाले. या दरम्यान संशयिताने युवकाचे नग्न अवस्थेतील अश्लिल फोटो मोबाईलमध्ये काढून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. काही काळानंतर तक्रारदार युवकाला ‘पार्वती’ ही व्यक्ती नसून, अब्दुल जलालउद्दीन शेख असल्याचे समजले. यानंतर युवकाने त्याच्याशी संपर्क कमी केला.
संपर्क कमी केल्यानंतर संशयित अब्दुल शेख याने आत्महत्या करण्याची धमकी देत युवकावर मानसिक दबाव टाकल्याचा आरोप आहे. गेल्या सहा महिन्यांपासून युवकाच्या मोबाईलवर सतत फोन करत नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात येत होती. याचबरोबर १५ लाख रुपयांची खंडणी मागितली जात होती, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर, पैसे न दिल्यास धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला आणि धर्मांतरास नकार दिल्यास युवक व त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
या तक्रारीच्या आधारे पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित अब्दुल जलालउद्दीन शेख आणि सलमा नायक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पंचवटी पोलीस करत आहेत. या प्रकरणामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.